Friday, 11 September 2015


बालवेद




माझा तिसरा कवितासंग्रह 'बालवेद' आजपासून धारावाहिक पद्धतीने सादर करीत आहे. पहिले पुस्तक 'उद्या लग्न आहे' प्रसिद्ध झाले तेंव्हापासूनच बालवेद मनात घोळत आहे. लहानपणी आई मुलांना काऊचिऊच्या गोष्टी सांगते. 'एक होता काऊ, एक होती चिऊ, काऊचं घर होतं शेणाचं, चिऊचं घर होतं मेणाचं' ही गोष्ट तर बहुधा वेदांपेक्षा जुनी असावी. ह्या व अशा अनेक गोष्टींच्या मुलांच्या मानसिक, बौद्धिक व सांस्कृतिक वाढीत असलेल्या महत्त्वाच्या संदर्भात 'असे वेद हा पाचवा, बालवेद' ही ओळ जेंव्हा 'उद्या लग्न आहे' च्या वेळेस सुचली, तेंव्हापासूनच ती मनात घर करून बसली. चिमण्यांना सांगितल्या जाणा-या गोष्टींवर एक पुस्तक लिहायचे असे तेंव्हाच ठरले व जवळ जवळ पुस्तक तयारही झाले. पण नंतर बाबांच्या जन्मशताब्दीने मला झपाटले. कुठून कोण जाणे, पण झंझावाती आठवणींचा 'वाडा' बांधून झाला व जन्मशताब्दीच्या दिवशी ते दीर्घकाव्य प्रकाशात आले. लहान लहान पावले टाकणारे 'बालवेद' मागे पडले. ते आज एक मोठे पाऊल पुढे टाकत आहे.


लांबलचक कविता लिहायची मला खोड आहे. थोडक्यात काही सांगणे मला जमतच नाही. मुद्दामून तसे करायचा ह्या पुस्तकात प्रयत्न केला आहे. कविता तुलनेने लहान आहेत.


पुस्तकाचे ७ खंडात विभाजन केले आहे: बालवेद, मानवचंद्र, विश्वास, निसर्ग, प्रश्न, कवी, व अवांतर. मानवचंद्र सोडून प्रत्येक भागात अनेक कविता आहेत. मानवचंद्र मात्र माझी जुनी खोड असणारी, मोठी जांभई आहे. हळूहळू सर्व भागांच्या लिंक्स अॅक्टिव्हेट होतील. नक्की वेळापत्रक नाही. त्यामुळे ब्लाॅगवर मधूनमधून आपले पाय (खरं म्हणजे लिंकवर आपले बोट) पडू द्यावे.


बाबांच्या जन्मशताब्दीनिमित्त सादर केलेली स्मरणिका ब्लाॅगवर आहेच. त्यातले 'स्मरण' विभागातले लेख व 'वाडा' काव्य वाचले नसेल तर जरूर वाचावे.


आजपर्यंतच्या आलेल्या प्रतिक्रिया 'प्रतिसाद' लिंकवर संकलित सापडतील. त्यात लवकरच तुमचीही संपादित व्हावी ही मनोमन इच्छा!


बालवेद आजच्या मुहूर्तावर सुरू करायचा आणखीही एक उद्देश आहे. आम्हा भावंडात सर्वात बाल, राजू उर्फ सुधीर सदाशिव मोहरीर, याचा आज जन्मदिवस, तिथीने गणेश चतुर्थीचा. बालांच्या २१ गोष्टी बालांपर्यंत पोहोचवायला आणखी उत्तम दिवस तो कोणता!


धन्यवाद!


अरुण सदाशिव मोहरीर

१७ - ९ - २०१५

गणेश चतुर्थी


Email:   arun.moharir@gmail.com


बालवेद



प्रतिसाद

No comments:

Post a Comment